Aupcharik shikshanachya padhati

औपचारिक शिक्षणाच्या त्रुटी

औपचारिक शिक्षणाच्या त्रुटी

आजवर चालत आलेल्या परंपरागत नि चौकटीतील शिक्षणपद्धतीत सर्वाधिक भर पाठ्यपुस्तकांवर दिला गेला आहे. मुलांमधील विविध क्षमतांच्या विकासाला कमी महत्त्व दिले गेले आहे. पाठ्यपुस्तके, पाठांतर, परीक्षा, गुण यांच्यासाठी चाललेली चढाओढ, शिकवण्या या औपचारिक शिक्षणपद्धतीच्या कठोर चौकटीत मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची मोडतोड होते. बाकांच्या रांगांमधून आखलेले शिस्तबद्ध वर्ग, प्रश्नोत्तरे, शब्दार्थ, गणिताच्या पायऱ्या यांपेक्षा फारसा अधिक विचार न करणारा शिक्षकवर्ग, मुलांना आवडेल-भावेल याचा विचार न करता आखलेला अभ्यासक्रम, रुक्ष घडे व धड्यांची प्रश्नोत्तरे यांपेक्षा अधिक काही अभिव्यक्त करता येऊ शकते.

 या जाणिवेचा स्पर्शही न झालेली पण याच पठडीतील शिक्षण घेत वयानुरूप वाढत्या प्रमाणात शिक्षित होणारी मुले, असे निराशाजनक चित्र औपचारिक शाळांनी उभे केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता निसर्गतः असतात, आणि कोणत्या क्षमता शिक्षणाने नव्याने रुजवता येतात, याचा अंदाज सामान्य शाळांतून केला जात नाही. व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी आवश्यक असलेली अंतःप्रेरणा, जिज्ञासा, अभिव्यक्ती, क्षमता यांचा विचार औपचारिक शिक्षणपद्धतीत केला जात नाही; ‘अक्षरनंदन’ मध्ये एकत्र आलेली मंडळी या साया गोष्टींचे भान ठेवून आहेत. त्यामुळे शाळेला शिक्षणाची काही वेगळी परिमाणे ती देऊ शकली आहेत.

‘शाळा’ ही विद्यार्थ्यांच्या आनंदाचा ठेवा बनली पाहिजे. आपले सुरक्षित चिमुकले विश्व सोडून, मुले शाळेच्या नव्या विश्वात पाऊल टाकत असतात. हे नवे विश्व त्यांना घराइतके सुरक्षित, प्रिय आणि आनंद देणारे ठरायला हवे. शिक्षण आनंददायी असते, ही कल्पना बालवाडीत मनात रुजली गेली, तर पुढचा ज्ञानमार्ग सुकर होतो. शाळा आनंदाचे घर बनावी, असा प्रयत्न ‘अक्षरनंदन’ने बालवाडीपासून केला आहे. त्यामुळे लोकसंगीताच्या ठेक्यावर झुलणारी, मुक्तपणे चित्रं काढणारी, बागडणारी मुले बत दिसतात. 

पहिली ते सातवीपर्यंतची सर्व मुले उत्साहाने वर्गातील अध्ययनात सहभागी होतात. शिक्षकांशी नाते जोडतात. शिक्षकांना आलेल्या पाहुण्यांना आपल्याला मार्गदर्शन करायला आलेल्या तज्ज्ञांना मोकळेपणाने प्रश्न विचारतात. या शाळेत त्यांना विचार करण्याचे नि विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असते. त्यामुळेच येथील विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान दिलेले दिसते. ‘सातवीनंतर या शाळेत आठवीचा वर्ग उघडला नाही तर आम्ही सत्याग्रह करू’ असे मुले म्हणतात. • शाळेतील अनौपचारिक शिक्षणपद्धतीच्या यशाची पावती यातून मिळते.

अनौपचारिक वर्गरचना

इमारतीचे बंधन अक्षरनंदन शाळेला येते. दुसऱ्या मजल्यावर शाळा असल्याने शाळेच्या आवारात, मैदानावर मुक्तपणे खेळण्याचे सौख्य मुलांना मिळत नाही. असे खेळणे शारीरिक विकासासाठी आवश्यक आहे. पण ही संधी इथल्या मुलांना नाही. शाळा उभारताना इमारतीच्या वर्गरचनेचा विचार शालेय उपक्रमांच्या गरजांनुसार होणे आवश्यक आहे. परंतु ‘अक्षरनंदन’ ला स्वतःची इमारत बांधणे अजून तरी शक्य झालेले नाही.

म्हणून मग शाळेने वर्गाच्या रचनांचा काही वेगळ्या प्रकारे पण नीट विचार केला आहे. मुलांना मोकळेपणी वावरता यावे म्हणून घडी घालून बाजूला ठेवता येतील अशी पार्टिशनस् दोन वर्गांमध्ये घातली आहेत. बाकांचे अवजड बंधन दूर सारले आहे. 

पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात मुलांना लिहिण्यासाठी छोटी बैठी स्टुले आहेत. ती हवी तेव्हा बाजूला सारता येतात. समोर फळा आहे, शिकवणारी ताई आहे, पण इथे मुलांना फळ्याकडे मान दुखेपर्यंत बघावे लागत नाही. ताईंना मुलांपर्यंत पोचण्यासाठी टेबल, खुर्चीचा, बाकांचा अडथळा पार करायचा नसतो. त्यामुळे मुले व ताई यांच्यामध्ये सहज नाते जुळण्यास मदत होते. मुले व ताई काही वेळेस एकत्र घोळका करून बसतात. तर कधी मुले छोटे छोटे गट करून आपल्याला दिलेला प्रकल्प पूर्ण करत असतात. 

या गटपद्धतीतून एकमेकांच्या सहकार्याने विचारांची देवाणघेवाण मुले करू शकतात. मग एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी नेतृत्व स्वीकारून सबंध वर्गाला काही सांगू शकतो. त्यामुळे शिकणे निरस, कंटाळवाणे न होता, सहज होते. विषयांनुसार आणि चाललेल्या अभ्यासानुसार वर्गाची अंतर्गत रचना बदलता येते किंवा मुले ती आपली आपण बदलू शकतात. याचा अर्थ असा, की शाळेला वर्गाची चौकट आहे; पण औपचारिक वर्गपद्धतीचे बंधन मात्र येथे झुगारून दिले आहे. याला ‘अनौपचारिक वर्गरचना’ असे म्हणता येईल.

शिक्षणाचे जीवनाशी नाते

अभ्यास फक्त वर्गात किंवा बंदिस्त इमारतीत करता येत नाही याचे भान ठेवून वेगवेगळ्या अनुभवांसाठी परिसराचा वापर अक्षरनंदन शाळेने करून घेतला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या उपक्रमांसाठी मुले अंगणात, गच्चीत आणि वेळप्रसंगी बाहेरच्या विश्वात जात असतात. बालवाडीची मुले पाने, फुले, दगड, बिया गोळा करायला अंगणात जातात. पहिलीची मुले स्वतःचा छोटा वाफा करतात, भाजी लावतात, ती रोपे मोठी होत असताना कौतुकाने न्याहाळतात. सेंद्रिय शेतीचा विचार सहजपणे आत्मसात करतात. 

तर इतर वर्गांतील विद्यार्थी बागकाम करतात या उपक्रमात सर्व मुले सहभागी होतात. ती कधी शब्दांतून, कधी चित्रांतून त्याची निरीक्षणे मांडतात. शाळेच्या स्वयंपाकगृहात, आपण पेरलेल्या भाज्यांची कोशिंबीर, भाजी करून बघतात. अशा उपक्रमांतून कितीतरी गोष्टी ते शिकतात. 

निरीक्षणे करायला शिकतात, भाषाविकास साधत असतात. सृष्टिविज्ञान कळत असते. सौंदर्यदृष्टीचाही विकास होत असतो. त्यांची आस्वादक्षमता वाढत असते. आणि पर्यावरणाचा, माणूस व निसर्ग ह्यांच्या परस्परसाहाय्याचा विचार करतात. यालाच एकात्म शिक्षण म्हणतात, सहज शिक्षण म्हणतात. त्याद्वारे नकळतपणे आपला जीवनव्यवहार त्यांना माहीत होतो.

‘भाजीचा वाफा तयार करणे’ या एका उपक्रमाचे हे विविध उपघटक आहेत किंवा एका विषयात मिसळलेले हे अनेक विषय आहेत, हे जेव्हा शिक्षकाला जाणवू लागते, तेव्हाच तो ज्ञानसमृद्ध होतो व विद्यार्थ्यालाही समृद्ध करतो. म्हणून प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ही मुले शिक्षकांसमवेत बाहेर पडतात.

 शाळेच्या बाहेर पडून रहदारीचे नियम समजावून घेतात, पोस्टमनकाकांची मुलाखत घेतात, रस्ते अस्वच्छ आहेत याबद्दल तक्रार नोंदवतात. मंडईत फिरून भाज्यांचे प्रकार, रंग, आकार बघतात. वजने कशी केली जातात, भाजी कशी विकतात हे जवळून बघतात. शाळेत त्याप्रमाणे दुकान मांडून बघतात. हे प्रत्यक्ष अनुभवजन्य शिक्षण मुलांना एकीकडे व्यवहाराचे पाठ देते तर दुसरीकडे परिसराची ओळख देते. त्यातून त्यांना आनंद मिळतो. वर्ग आणि परिसर यांच्यातील भिंती अशा कमी केल्या तर शिक्षण खरेखुरे अर्थपूर्ण होऊ शकेल. 

समूहाने बाहेर वावरताना स्वयंशिस्तही त्यांच्या अंगी बाणली जाते. स्वतःला व इतरांना सांभाळण्याचे धैर्य त्यांना मिळते. धीटपणा येतो. एकेक अनुभव अशा रीतीने मुलांच्या विविध क्षमतांचा विकास घडवून आणत असतो. मुख्यत: यातून घडून येणारा श्रमकार्याचा संस्कार अधिक जीवनोपयोगी ठरण्याचा संभव असतो. येथे शिक्षणाने प्रत्यक्ष जीवनाशी नाते जोडलेले दिसते.

शिक्षणात सर्वात महत्त्वाचे आहे हे शिकू पाहणारे ‘मूल’. म्हणून त्याचा विचार शिक्षणाच्या केंद्रस्थानी असणे अत्यावश्यक आहे. त्याचे वय, आवडीनिवडी, क्षमता, त्याचे हळुवार मन, एक स्वतंत्र्य व्यक्ती म्हणून असलेले त्याचे अस्तित्व व हक्क, कुटुंबातून बाहेर पडल्यानंतर समाजाशी जुळणारे वा न जुळणारे त्याचे नातेसंबंध, परिसराला समजावून घेण्याची त्याची क्षमता यांचा विचार व्हावा व त्यानुसार त्याच्यापुढे ज्ञान ठेवावे. 

मूल आपल्या परीने ते ज्ञान ग्रहण करत असते. त्याचा अर्थ लावत स्वतःत बदल घडवत असते. प्रथम एका गोष्टीचा ठळक दिसणारा एकच अर्थ त्याला लावता येतो. नंतर एका घटनेच्या दोन तर्कसंगती त्याच्या लक्षात येऊ लागतात. पियाजेच्या या तत्त्वाचा विचार, मुलाला शिक्षण देत असताना अधिकत्वाने करावा लागतो. साधारणपणे, प्रत्येक मुलाचा एवढा स्वतंत्र विचार करणे मोठ्या शाळेत कदाचित शक्य नसेल, पण ‘अक्षरनंदन’ मध्ये मुलांमधील या सर्व घटकांचा विचार करून शिकवण्याची तंत्रे तयार केली आहेत. मुलाच्या क्षमतांचा विचार करून शिक्षणसंधी त्याच्या पुढे ठेवायच्या, म्हणजे त्याच्यावर अन्याय होणार नाही, याची येथे सदैव काळजी घेतली जाते.

अशाप्रकारे औपचारिक शिक्षणाच्या त्रुटी आहेत.