अनिल मेहता महाराष्ट्रातील उद्योजक
इट्स ऑलवेज पॉसिबल……
“मराठी प्रकाशनव्यवसायाला उत्तम भवितव्य निश्चितच आहे. आज जरी शहरातून इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढत असल्या तरी खेड्यापाड्यांत अजूनही इंग्रजीचा प्रसार-प्रचार तेवढा होत नाहीच. इंग्रजी माध्यमात शिकलेली मुलंदेखील मराठी साहित्यच याचत आहेत आणि वाचत राहतीलही, इंग्रजीचा प्रभाव कितीही वाढला तरी मराठी वाङ्मयावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. चौफेर वाचन, चौफेर नजर आणि समाजाची गरज ओळखून विविध विषयांवरील पुस्तकं प्रकाशित केल्यास या व्यवसायाला उत्तम भवितव्य आहे.” हा दुर्दम्य आशावाद आणि अनुभवाचे बोल आहेत मराठीतील नामवंत व ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांचे !
१९६५ साली कोल्हापुरात ‘अजब पुस्तकालय’ या दुकानाद्वारे पुस्तकविक्रीच्या व्यवसायात उतरलेल्या मेहतांनी गेल्या ४४ वर्षांत पुस्तकविक्री वितरण यांचबरोबर पुस्तकप्रकाशन या क्षेत्रांत गगनभरारी घेत अनेक मापदंड निर्माण करत, लेखक-अनुवादक यांची जबरदस्त फळी घडवून विशेषतः मराठी साहित्याचं दालन समृद्ध केलं आहे.
पुण्याच्या बी.एम.सी.सी. कॉलेजमध्ये बी.कॉम. झाल्यानंतर अनिल मेहतांनी पुणं सोडलं आणि ते निपाणीच्या त्यांच्या घरच्या दुकानात बसू लागले. मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा व कल्पकदृष्टी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. काहीतरी वेगळा व्यवसाय करावा या विचाराची बीजं त्यांच्या मनात रुजली होती. त्यानुसार त्यांनी निपाणीतील नामवंत उद्योगपती व मेहता कुटुंबीयांचे स्नेही देवचंद शहा यांना हा विचार बोलून दाखवला. अनुभवी मार्गदर्शनाखाली अनिल मेहता निपाणी सोडून कोल्हापुरात आले. देवचंद शहा यांनी त्यांना केवळ मार्गदर्शन व प्रोत्साहनच दिलं असं नव्हे तर कोल्हापुरात जागा मिळवून देण्याचं व व्यवसायासाठी भांडवल देण्याचंही काम केलं आणि इथून मेहतांच्या जिद्दीच्या कहाणीचा प्रारंभ झाला.
१९६५ साली कोल्हापुरात भाऊसिंगजी रोडवर त्यांनी दुकान सुरू केलं. या दुकानात मुख्यत्वे पुस्तकविक्री होत असली तरी त्यासोबत त्यांनी इतर विविध वस्तू, शालेय स्टेशनरी इ. साहित्यही तिथं विक्रीसाठी ठेवलं. दुकानाची ही जागा अंबाबाई मंदिराच्या परिसरात अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी आहे, शिवाय त्या काळी दुकानासमोरच राजाराम कॉलेज होतं, करवीर नगर वाचन मंदिर हे नामवंत ग्रंथालयही नजीकच आहे. साहजिकच या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक, साहित्यप्रेमी मंडळी यांचा राबता सुरू झाला. मेहता स्वतः उत्तम वाचक आहेत. त्यांचा वाचनव्यासंग अफाट आहे. शिवाय स्वभाव बोलका आणि “ग्राहकदेवो भव हा तर मंत्रच !” मेहतांनी वाचनप्रिय ग्राहकांमध्ये पुस्तकांबद्दलच कुतूहल चेतवलं आणि त्यांच्या दुकानात केवळ पाठ्यपुस्तकं व गाईड्सनाच नव्हे तर सर्व साहित्यप्रकारांतल्या पुस्तकांनाही मागणी वाढू लागली. लवकरच त्यांच्या दुकानात अंकलिपी ते एन्सायक्लोपीडिया इथपर्यंत काहीही मागा, पुस्तक हजर असा मापदंड त्यांनी निर्माण केला. त्यांच्या दुकानात शालेय अभ्यासक्रमाची पुस्तकं व गाइड्स भरपूर विकली जात असत. यातून त्यांच्यातल्या
चतुर व्यावसायिकानं संधी हेरली, पुस्तकं आणि गाइडस् नुसती विकत राहण्यापेक्षा आपण स्वतःच ती प्रकाशित करून का विकू नयेत, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांच्या प्रकाशक बनण्याच्या मार्गातील हे पहिलं पाऊल होतं. तो काळ होता साधारण १९७० सालच्या दरम्यानचा. मग त्यांनी कोल्हापूर आणि परिसरातल्या तरुण प्राध्यापकांना गाठून त्यांना गाइड्स लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यावेळपर्यंत कोल्हापुरात अगदी प्राथमिक अवस्थेत असलेल्या या व्यवसायाचं रूपच पालटलं. धडाडी, कल्पकता, महत्त्वाकांक्षा, नवउपक्रमशीलता आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी, जोडीला परिपूर्णतेचा ध्यास या आयुधांनिशी मेहतांच्या प्रकाशनव्यवसायातील वाटचालीला दमदार प्रारंभ झाला.
चांगला प्रकाशक होण्यासाठी या व्यवसायाला पुस्तकविक्रीव्यवसायाची जोड असणं गरजेचं आहे. त्यामुळं दुकानात आलेली पुस्तकं सहजपणे चाळता येतात. साहित्यक्षेत्रातील नव्या घडामोडी समजतात तसंच कोणत्या प्रकारची पुस्तकं विकली जातात तेही कळतं असं मेहता म्हणतात. बहुतेक सगळ्या प्रकाशकांच्या करिअरची सुरुवात गाइड्स व टेक्स्ट पुस्तकांनीच झाली आहे. तसंच मेहतांनी प्री. डिग्रीच्या इंग्रजी विषयाच्या गाइडनं या नव्या करिअरची मुहूर्तमेढ रोवली. प्रारंभी ते प्रामुख्यानं गाईडस् प्रसिद्ध करत होते पण सर्वार्थानं पुस्तकप्रेमी असलेलं त्यांचं मन एवढ्यावरच समाधानी नव्हतं, गाइड्सच्या व्यवसायात ठोस व हुकमी प्राप्ती होत होती पण त्यांना त्या जोडीनं मानसिक समाधान हवं होतं, सांस्कृतिक कार्याला हातभार लावण्याची इच्छा होती. म्हणून
त्यांनी सुरुवातीला कोल्हापुरातील नवोदित साहित्यिकांचं साहित्य प्रसिद्ध करायला सुरुवात केली. त्या दरम्यान, बापूसाहेब गावडे या गोष्टीवेल्हाळ, कलंदर कलावंतांशी त्यांचा परिचय झाला. १९७१ साली त्यांनी गावडे यांची ‘दसऱ्याचं सोनं’ ही कादंबरी प्रसिद्ध करून आणखी एक पाऊल पुढं टाकलं. यानंतर त्यांनी इतरही काही पुस्तकं प्रकाशित केली. पुस्तकविक्रीतला अनुभव त्यांच्या गाठीशी होता, त्यासंबंधित बऱ्याच ओळखी होत्या, तरी वितरणक्षेत्रातला अनुभव मात्र नव्हता. या सर्व मार्गात भरपूर खाचखळगे होते, पण आपण नव्या गोष्टी करू शकतो या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांची वाटचाल सुरू होती. मराठीतील ज्येष्ठ लेखक डॉ. आनंद यादव आणि अनिल मेहता यांचा कॉलेजजीवनापासून स्नेह होता. या
दरम्यान डॉ. यादव लेखक म्हणून नावारूपाला येत होते. मेहतांनी त्यांच्यापुढे त्यांचं पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या दरम्यान डॉ. यादव मुंबईतील ‘मौज प्रकाशन’कडे पुस्तकं देत होते. डॉ. यादव यांनी मैत्रीखातर अनिल मेहतांना पुस्तक द्यायचं कबूल केलं मात्र दोन सूचना केल्या. त्यांची पुस्तकं प्रसिद्ध करायची असतील व प्रकाशनक्षेत्रात मनापासून रस असेल तर त्यांनी मेहतांना पुण्यात हा व्यवसाय सुरू करावा असं सुचवलं व दुसरं, प्रकाशनाचं नाव बदलायला सांगितलं. पुण्या-मुंबईत छपाईचं तसंच पुस्तकाच्या स्वरूपाचं तंत्र फारच पुढं गेलेलं असल्यामुळे तिथे यासंदर्भातील उत्तम गुणवत्ता लाभणं सहज शक्य होतं. त्या जोडीनं अचूकता, सुबकपणा याबाबतीतही तिथली यंत्रणा आधुनिक व प्रगत होती. अनुभवी चित्रकार व मुद्रितशोधक उपलब्ध होते. छापखान्यांमध्ये स्पर्धा होती. या साऱ्यांचा लाभ या व्यवसायात उमेदीनं उतरलेल्या आपल्या मित्राला मिळावा यासाठी डॉ. यादव यांनी ही कल्पना सुचवली. तसंच लेखक म्हणून पुस्तकनिर्मितीसंबंधी त्यांच्या अपेक्षाही सांगितल्या.
कोल्हापुरात व्यवसाय इतका उत्तम स्थिरावलेला असताना, पुण्यात येऊन अनिश्चिततेच्या अंधारात उडी घ्यायला इतर कुणी धजावलं नसतं पण मेहतांनी मोठ्या धडाडीनं आणि हिमतीनं हा निर्णय घेतला आणि १९७६ साली दिवाळीच्या दरम्यान ‘मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे’ ची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी एका मित्राचा पत्ता देऊन कामाला सुरुवात केली. लवकरच चित्रशाळेजवळच्या एका छोटेखानी फ्लॅटमध्ये ‘मेहता पब्लिशिंग हाउस’ सुरू झालं. डॉ. आनंद यादव यांचा ‘माळावरची मैना’ हा विनोदी कथासंग्रह हे या प्रकाशन संस्थेच ‘क्रमांक एक’चं पुस्तक होतं. त्यानंतर हा वेलू भरारी घेत घेत आज जवळपास ६००० इतक्या पुस्तकसंख्येवर जाऊन पोहोचला आहे.
या जवळजवळ तीन तपांच्या प्रवासाचा आलेख जरी चढ़ता दिसत असला तरी हा प्रवास सहजसुकर नक्कीच नव्हता. ‘मेहता पब्लिशिंग हाउस’च्या आजच्या उत्तुंग यशात अनिल मेहता यांची अपरिमित ऊर्जा, वास्तवाचं पक्कं भान राखूनही कल्पक योजना, वस्तुनिष्ठ विचार, नावीन्याचा पुरस्कार, धोका पत्करण्याची तयारी, प्रचंड चिकाटी, काहीतरी वेगळं करून दाखवण्याची ऊर्मी, आजूबाजूच्या परिस्थितीचं नीट आकलन, व्यवसायातील बदलत्या प्रवाहांचा वेध घेण्याची क्षमता, नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्याची, ते आत्मसात करण्याची व ते आपल्याकडे ‘अॅप्लाय’ करण्यास सतत सज्ज असण्याची वृत्ती अशा यशस्वी उद्योजकांच्या ठायीं आढळणाऱ्या अनेक गुणवैशिष्ट्यांचा मोलाचा वाटा आहे. पुण्यासारख्या ठिकाणी मेहता नव्यानं बाहेरून आलेले, त्यात अमराठी…. त्यांना बराच छुपा विरोध झाला, त्यांच्या मार्गात अडथळे उभे करण्याचा प्रयत्न झाला पण मेहता या साऱ्याला पुरून उरले आणि व्यवसायाची वृद्धी करत पाय रोवून ठामपणे उभे राहिले.
चित्रशाळेजवळच्या फ्लॅटमधलं एका मदतनीसाच्या साहाय्यानं चालणारं छोटंसं ऑफिस ते आजचं माडीवाले कॉलनीतील सुमारे ४० स्टाफ असलेलं, सुसज्ज, अत्याधुनिक, देखणं भव्य ऑफिस, या स्थित्यंतरादरम्यान मेहतांनी या व्यवसायाशी निगडित विविध घटकांचे भलेबुरे अनुभव घेतले. काही मान्यवर व प्रथितयश लेखकांनीही त्यांना धक्कादायक अनुभव दिले, पण विशेष म्हणजे आज त्यांच्या मनात या कशाबद्दलही जराही कटुता नाही. उलट, या अनुभवांनी जीवनाचे धडे देऊन आपल्याला शहाणं केलं असं ते मानतात, तर या व्यवसायाच्या निमित्तानं ज्या विलक्षण प्रतिभावंत दिग्गजांचा परिचय घडला, ज्यांच्या स्नेहाचा लाभ झाला, त्यांच्या सहवासातील क्षणांनी आपलं आयुष्य समृद्ध झालं असं त्यांना वाटतं.
प्रकाशनव्यवसायात पाय रोवण्यासाठी धडपडत असताना, कोल्हापूर-पुणे अशा सतत वाया करत दोन्ही आघाड्या सांभाळताना त्यांनी अनुवादित पुस्तकं या प्रकाराकडं गांभीर्यानं पाहायला सुरुवात केली. १९७३ साली त्यांनी अजित वाडेकर यांचं ‘क्रिकेटच्या मैदानावर’ हे कै. माधव मोर्डेकर यांनी मराठी अनुवाद केलेलं पुस्तक प्रकाशित केलं. त्यानंतर त्यांनी ‘डायरी ऑफ अॅन फ्रँक’ हे मंगला निगुडकर यांनी अनुवादित केलेलं पुस्तक बाजारात आणलं. वाचकांना राजकीय पार्श्वभूमीची पुस्तकं बरीच आवडतात ही गोष्ट त्याच दरम्यान त्यांच्या लक्षात आली. मग त्यांनी ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ हे पुस्तक मराठीत आणलं. या पुस्तकानं प्रकाशनाआधीच बराच वादंग माजवला होता. हे पुस्तक आपल्याला सर्वार्थानं खूप काही शिकवून गेलं असं ते मानतात. त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधींची व त्यांच्यावर लिहिलेली काही पुस्तकं प्रसिद्ध केली. पुढं ‘वॉटरगेट’ नं विक्रम केला. या पुस्तकाच्या एका आठवड्यात ४००० प्रती खपल्या होत्या.
अनुवादित साहित्याकडं लक्ष पुरवत असतानाच त्यांनी रत्नाकर मतकरी, बबन प्रभू अशा नाटककारांशी नाटक प्रसिद्ध केली. दरम्यान ‘मेहता पब्लिशिंग हाउस’चा लेखकवर्ग तयार होत होता. वि. स. वाळिंबे, शांता शेळके, व. पु. काळे, ‘रुचिरा’च्या कमलाबाई ओगले, विज्ञानलेखक निरंजन घाटे, बाळ फोंडके, अशोक पाध्ये असे लेखक त्यांच्या प्रकाशनसंस्थेमध्ये आले. त्यानंतर विश्वास पाटील, माधुरी शानभाग, डॉ. सुनीलकुमार लवटे, माधवी देसाई असे बरेच लेखक लेखिका मेहतांसाठी लिहू लागले.
दरम्यान मेहता अनुवादकांची फळी घडवत होते. त्या काळापासून आजअखेर, मेहतांसाठी सुमारे साठ अनुवादकांनी काम केलं आहे. आज सुप्रिया वकील, अपर्णा वेलणकर, लीना सोहोनी, अंजनी नरवणे, प्रमोद जोगळेकर, अजित ठाकूर, रवींद्र गुजर, विजय देवधर, भारती पांडे, सुनंदा अमरापूरकर इत्यादी अनुवादकांच्या मोहतांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांना वाचकांची चांगली मागणी असल्याचं चित्र दिसतंय.
“अनुवादासाठी पुस्तकं मिळवताना मेहतांनी संबंधित लेखकाशी थेट संपर्क साधण्याची पद्धत ठेवली अण्ण शौरी, नानी पालखीवाला, अरुंधती रॉय, सुधा मूर्ती, शोभा डे, किरण बेदी, तसलिमा नसरीन, चेतन भगत, इत्यादी लेखकांशी त्यांनी कुणाही मध्यस्थाविना संपर्क साधला आणि या व्यक्तींची पुस्तकंच नव्हे तर त्यांच्या स्नेहाची भेटही मिळवली. या लोकांचा वक्तशीरपणा, टापटीप स्थांना भारावून टाकतो तर त्यांचा स्नेह हाते अमूल्य ठेवा मानतात.
कै. नानी पालखीवाला व अरुण शौरी या दोन विद्वान दिग्गजांप्रती त्यांच्या मनात अपार आदर आहे. भारतीय पातळीवर मान्यता असलेल्या लेखकांची त्यामध्ये केवळ इंग्रजीच नव्हे तर हिंदी, बंगाली, मुजराती, उडिया, कन्नड, मल्याळम भाषांतील पुस्तकांचाही समावेश आहे. पुस्तकं त्यांनी अनुवादित करून घेऊन प्रसिद्ध केलीच, त्याचबरोबर परदेशी साहित्यविश्वातील मान्यवरांची पुस्तकंही त्यांनी अनुवाद करून घेऊन प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळेच भाषा, प्रांत, संस्कृती यांच्या सीमांपलीकडं जात रवींद्रनाथ टागोर, शरचंद्र चट्टोपाध्याय, डॉ. शिवराम कारंत एस. एल. भैरप्पा, महाश्वेतादेवी, खुशवंतसिंग, सुधा मूर्ती अशा भारतीय लेखकांपासून ते जॉन ग्रे, इयान फ्लेमिंग, अॅलिस्टर मेक्लिन, डेबोरा एलिस, रॉबिन कुक, जेफ्री आर्चर, डॅन ब्राउन, हिलरी क्लिन्टन अशा परदेशी लेखकांपर्यंत विविध प्रकारच्या लेखकांच्या विविध प्रकारच्या लेखकानी मराठी साहित्याचं एक दालन दिमाखात नटलं आहे व वाचकांना अनुभवसमृद्ध करत आहेत.
‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ किंवा ‘व्हाइट टायगर’ सारखं जागतिक कीर्तीचं ‘बुकर’ विजेतं पुस्तक असो, मेहता लोकांची अभिरुची व इंटरेस्ट लक्षात घेऊन त्या पुस्तकाचे तत्परतेनं हक्क विकत घेतात. त्याचा सकस व रसपूर्ण मराठी अनुवाद करून घेऊन, त्या पुस्तकाचं वाचकाच्या मनात असणारं कुतूहल शमण्याच्या आत ते पुस्तक वाचकाच्या हातात ठेवतात. अशा प्रकारची व्यावसायिकता त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक जपलेली दिसते.
अनुवादित पुस्तकांच्या संदर्भातील त्यांचे कल्पक उपक्रम त्यांच्या प्रकाशनाच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेतच, त्या जोडीनं ते मराठी प्रकाशनविश्वातही नवा पायंडा पाडणारे, इतरांसाठी मार्गदर्शक व लक्षवेधी ठरले आहेत.
मेहतांनी केवळ अनुवादित पुस्तकंच रसिक वाचकांपर्यंत पोहोचवली नाहीत तर त्यांनी लेखक / अनुवादक व याचक यांच्या दरम्यान दुवा बनून त्यांचा प्रत्यक्ष संवाद घडवला आहे. त्यांनी आजवर पुस्तकप्रकाशन, मुलाखती अशा माध्यमांतून महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक, इ. ठिकाणी किरण बेदी, सुधा मूर्ती, अरुण शौरी, जसवंत सिंग, नाना पालखीवाला, तसलिमा नसरीन आदी लेखकांचा वाचकांशी प्रत्यक्ष परिचय घडवण्याचं काम सातत्यानं केलं आहे व यानिमित्तानं वाचकांशी एक निराळंच नातं जोडलं आहे. अशा प्रकारचे उपक्रम आजवर कुणीही न केल्यामुळे या गोष्टींना खूप प्रसिद्धी मिळाली, हे सगळे कार्यक्रम लोकांना भावले शिवाय ‘मेहता’ या नावाला वलय लाभलं आणि लोकांचा दृष्टिकोनही बदलला
अनुवादित पुस्तकांच्या संदर्भातला आणखी एक महत्त्वपूर्ण व नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजे ‘टी-बुक क्लब’ या योजनेत मेहता अनुवादित पुस्तकं वाचकांना निम्म्या किमतीत देतात. या क्लबचा नियमित वाचकवर्ग आहे. मराठीत ही योजना बहुधा फक्त मेहताच राबवत असावेत. या उपक्रमामुळेही मेहता पब्लिशिंग हाउस व वाचक यांचे प्रत्यक्ष भावबंध निर्माण झाले आहेत. या टी-बुक क्लबचे १००० सभासद असून ते कायमचे ग्राहक आहेत. वाचनसंस्कृती हरवत चाललीय अशी ओरड होत असते त्या काळातच मेहतांचं चिकाटीनं सुरू असलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद व प्रकाशनक्षेत्रात त्यांचं खास असं स्थान निर्माण करणारं आहे.
मेहतांनी विविध क्षेत्रांतील पुस्तकं प्रकाशित केली आहेत. जेम्स बाँड मालिका, चिकन सूप मालिका, आरोग्य, आत्मकथन, वैचारिक, गूढकथा, संदर्भग्रंथ, शब्दकोश, पत्रकारिता, वास्तुशास्त्र, शेतीविषयक, व्यक्तिमत्त्व विकास, ऐतिहासिक, राजकीय, बालसाहित्य, विज्ञानसाहित्य विषयांचा आवाका पाहिला तर त्यांनी के विलक्षण विश्व उभं केलंय याची कल्पना येते. अनुवादासाठीही त्यांनी आशयसंपन्न पुस्तकंच निवडली आहेत हे लक्षात येईल. चिंतनशील, अभ्यासू वाचक असो की ललित साहित्याचा चाहता.. कोणत्याही स्तरातील, कुठल्याही वयोगटातील वाचकाला आवडतील अशी पुस्तकंच मेहतांनी प्रसिद्ध केली आहेत.
दरवर्षी २३ एप्रिल रोजी ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त शालेय विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या आत्मचरित्राच्या प्रती विनामूल्य वितरीत करून मेहतांनी मुलांमध्ये वाचनाची आवड रुजवणं, त्यांच्यापर्यंत संस्कारक्षम साहित्य पोहोचवणं हे उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
१९७८-७९ साली मेहतांच्या व मेहता पब्लिशिंग हाउसच्या आयुष्यात एक सोनेरी वळण आलं. त्या काळी कै. रणजित देसाई यांची ‘स्वामी’ कादंबरी खूप प्रकाशझोतात होती. मेहतांच्या दुकानातही ‘स्वामी’ चा खप खूप मोठा होता. रणजितदादांच्या दोन्ही मुली सासरी कोल्हापुरात असल्यामुळे त्या अधूनमधून कोवाडहून कोल्हापूरला त्यांच्याकडे येत असत, तेव्हा मेहतांना भेटत असत. यातूनच रणजित देसाई व मेहतांचे स्नेहबंध जुळले आणि या रेशीमगाठी इतक्या पक्क्या झाल्या की, मेहता त्यांचे मानसपुत्र बनले. मेहतांच्या दुकानात देवाच्या तसबिरीशेजारी रणजित देसाई यांचा फोटो व ‘स्वामी’ चं मुखपृष्ठ पाहायला मिळतं. असं त्यांच्यामध्ये विलक्षण आत्मीय, शब्दांपलीकडलं नातं आहे. दरम्यान, रणजित देसाई व त्यांचे प्रकाशक यांच्यात ताण निर्माण होऊ लागला होता. यातूनच रणजित देसाईंनी त्यांची ‘समिधा’ ही कादंबरी मेहतांना दिली. ते १९७९ साल होतं. तेव्हापासून रणजित देसाई मेहतांचे लेखक झाले आणि ‘मेहता पब्लिशिंग हाउस’ला एक आगळीच प्रतिष्ठा प्राप्त झाली. अलीकडेच ‘स्वामी’च्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीचा कोल्हापुरात मोठ्या दिमाखात प्रकाशनसोहळा झाला.
कै. रणजित देसाई यांच्या स्मृत्यर्थ अनिल मेहतांनी ‘मेहता पब्लिशिंग हाउस फाउंडेशन’तर्फे मराठीतील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी दरवर्षी तीन पुरस्कार देण्याची प्रथा सुरू केली. ‘स्वामी’ कार रणजित देसाई पुरस्कार, कमलाबाई ओगले पुरस्कार, लाभसेटवार प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा पुरस्कार अशी या पुरस्कारांची नावे आहेत. दरवर्षी रणजितदादांच्या जन्मदिनी ८ एप्रिलला हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. रणजित देसाईबरोबरच वि. स. खांडेकर, कमलाबाई ओगले, व. पु. काळे, शंकर पाटील यांच्या बहुतेक सर्व
पुस्तकांचे हकही मेहतांनी घेतले आहेत.
१९९७ साली ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ नं ‘मेहता मराठी ग्रंथजगत’ ही गृहपत्रिका सुरू करून वाचक, ग्राहक व विक्रेत्यांसाठी साहित्यिक घडामोडी व विविध योजना यांची माहिती देण्याचं काम सुरू केलं. हे अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेलं मासिक त्यांच्या सगळ्या विक्रेत्यांकडे जातं. याचे ३००० च्या वर वर्गणीदारही आहेत. हे मासिक पंधरा हजारांवर लोकापर्यंत पोहोचतं. आजच्या घडीला वाङ्मयीन मासिक म्हणून ‘मेहता मराठी ग्रंथजगत’ नं चांगलंच नाव मिळवलंय व स्वतःचं स्थान निर्माण केलंय. मेहतांनी मार्केटिंगच्या ज्या नवनव्या कल्पना राबवल्या, जी तंत्र वापरली त्यांतला हा एक महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल. विक्रेत्यांना नव्या पुस्तकांची मुखपृष्ठ व पोस्टर्स पाठवून ती त्यांच्या दुकानात दर्शनी स्वरूपात ‘डिस्प्ले’ करायला सांगणं हेही मेहतांनी सातत्यानं व मोठ्या प्रमाणात सुरू केलं आहे. पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी वृत्तपत्रांच्या रविवारच्या आवृत्तीतल्या जाहिराती अत्यंत गरजेच्या आहेत असं त्यांना वाटतं कारण वृत्तपत्रांतील परीक्षणं बरेचदा फार उशिरा येतात, त्यामुळे नवं पुस्तक प्रकाशित झाल्याचं वाचकांना कळण्यासाठी जाहिरात हे माध्यम त्यांना महत्त्वाचं वाटत बदलत्या काळानुसार मेहतांच्या जाहिराती वृत्तपत्रांसोबतच एफ. एम. रेडिओ स्टेशन्स, आकाशवाणी, दूरचित्रवाणी या माध्यमांमध्येही झळकू लागल्या आहेत.
कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी परिपूर्णतेचा ध्यास आणि समर्पित वृत्ती आवश्यक असते, तशी ती या व्यवसायातही आवश्यक आहे आणि अनिल मेहता यांनी अगदी सुरुवातीपासून २४ x ७ हे सूत्र आचरणात आले आहे. त्यांना ‘वकोहोलिक’ हे बिरूद लावलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. सुरुवातीच्या काळात जे समोर ते प्रसिद्ध करण्याकडे त्यांचा कल असला, तरी पुढे मात्र त्यांनी संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक दर्जाकडे कटाक्ष पुरवला, पुस्तकाच्या निर्मितीच्या दर्जाबाबतही ते काटेकोर लक्ष पुरवतात. त्यामुळेच मुखपृष्ठ, टाइप, रंगसंगती अशा सर्वच बाबतींत मेहतांची पुस्तक अव्वल दर्जाची व लक्ष वेधून घेणारी असतात. ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’ तर्फे त्यांना पुस्तकनिर्मितीसाठी पारितोषिक देऊन अनेकदा गौरवण्यात आलं आहे यात लाटू नये ! १९९६ साली त्यांना ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’ तर्फे उत्कृष्ट प्रकाशकासाठी देण्यात देणाऱ्या पुरस्काराने गौरवण्यात आले तर १९९७ साली, मेहता पब्लिशिंग हाउस’ ला मराठी प्रकाशनक्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा ‘वि. पु. भागवत पुरस्कार मिळाला.
१९८२ सालापासून अनिल मेहतांनी ‘वर्ल्ड बुक फेअर’ मध्ये हजेरी लावायला सुरुवात केली आणि त्यांच्या कक्षा आणखी विस्तारल्या. या ठिकाणी मराठी पुस्तकांचे स्टॉल्सच नाहीत ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी या महत्त्वपूर्ण प्रदर्शनात मराठी पुस्तकांचा स्टॉल लावायला सुरुवात केली. मराठीत यापूर्वी कुणीही ही बाट चोखाळली नव्हती. मेहतांच्या या धाडसामुळे मराठी पुस्तकं सातासमुद्रापार जाऊ लागली, परदेशी ऑर्डर्स मिळू लागल्या.
अनिल मेहतांनी ‘मराठी प्रकाशक परिषद’ या संस्थेचं अध्यक्षपद १५ वर्ष भूषविलं आहे. तसंच ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’ या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पुण्यात प्रकाशकांची सेमिनार्स, नॅशनल कन्व्हेन्शन सारखे उपक्रम आयोजित केले आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमांना भारतभरातून मान्यवर प्रकाशकांची लक्षणीय उपस्थिती होती. पायरसी, कॉपीराईट अशासारख्या चालू घडीला तीव्र स्वरूपात पुढे येणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी या व्यवसायातल्या लोकांसाठी मार्गदर्शनपर विचारमंथन घडवण्यासाठी कार्यक्रम घेतले आहेत. प्रकाशकांच्या संघटनेसाठी काम करताना त्यांचा लोकसंग्रह व संपर्काचा परिघ अधिकच विस्तारला. यामुळे त्यांची इतर भाषेतील प्रकाशकांशी मैत्री झाली, त्यांच्या संकल्पना समजण्यास मदत झाली. या निमित्तानं विविध भारतीय भाषांमधल्या साहित्याचं अनुवादासाठी आदान प्रदान घडू लागलं. ‘राजा रविवर्मा’, ‘अमृतवेल’ अशी मराठी पुस्तकं मल्याळीत गेली, तसंच काही मराठी पुस्तकांचे गुजरातीतही अनुवाद झाले. हे आदानप्रदान हळूहळू पण बरंच वाढत चाललं आहे.
अशा प्रकारे या व्यवसायात नवनवी शिखरं सर करत ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ची वाटचाल सुरू आहे. अनिल मेहतांनी आता ‘मेहता पब्लिशिंग हाउस’ची सगळी सूत्रं त्यांचे सुपुत्र सुनील यांच्या हाती सोपवली आहेत. हे नव्या पिढीचे, नव्या दमाचे शिलेदार पित्याच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबद्ध रीतीनं, नवनव्या संकल्पनांसह ‘मेहता पब्लिशिंग हाउस’ चा वाढता व्याप यशस्वीरीत्या सांभाळत आहेत, त्यांनी ‘मेहता पब्लिशिंग हाउस’ची आर्थिक व्यवहार अधिक सुसूत्र व सुबद्ध केला आहे. पूर्वीच्या व्यवहाराच्या अनेक पद्धती बदलल्या आहेत. ते गेली ५ वर्ष सातत्यानं जगातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या ‘फ्रँकफर्ट बुक फेअर’ ला हजेरी लावत आहेत, नवनवीन पुस्तकांचे हक्क मिळवत आहेत. परदेशी प्रकाशकांशी संबंध प्रस्थापित करत आहेत. आता मेहतांनी इंग्रजी प्रकाशनाकडेही दमदार वाटचाल सुरू केली आहे.
ज्या काळात, वाचनाची आवड कमी होत आहे असा सार्वत्रिक सूर दिसतो, पुस्तकविक्रीच्या संदर्भात प्रकाशकही काहीसे निराश दिसंतात, त्या काळात ‘वाचकांना आपण चांगलं दिलं तर त्याला नक्कीच यश मिळत या विश्वासाच्या बळावर मेहतांची वाटचाल सुरू आहे. आता ते मराठीत ई-बुक्स ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर उतरवण्यास उत्सुक आहेत व त्यादृष्टीनं तयारीला लागले आहेत. ‘इट्स ऑलवेज पॉसिबल’ हा आत्मविश्वास असणाऱ्या या जिद्दी माणसाच्या दृष्टीनं अशी आव्हानं पेलणं मुळीच अशक्य नाही, नाही का ?