ananddai shikshanachi srujanshil padhat

आनंददायी शिक्षणाची ‘सृजनशील’ पद्धत

आनंददायी शिक्षणाची ‘सृजनशील’ पद्धत

आम्ही प्रवेश केला तो होता शाळेतील चौथीचा वर्ग; वर्गात विज्ञानातील ‘ऊर्जा’ हा पाठ चालू होता. ‘ऊर्जा म्हणजे काय’ हे आधीच्या तासाला शिकवून झाले होते. ऊर्जा कशा कशासाठी लागते व ती कोठून मिळते हे प्रात्यक्षिकातून शिक्षक शिकवत होते. मुलांचा प्रतिसाद उत्साही दिसत होता. ‘तुम्ही एका खोलीत आहात, दुपारची वेळ आहे, पंखे नाहीत, तुम्हाला खूप उकडतंय’ ‘रात्रीची वेळ आहे, अभ्यास करीत असताना अचानक दिवे गेले’. ‘तुम्ही तुमच्या चारचाकी गाडीतून जात आहात व गाडी मध्येच बंद पडली,’ असे प्रसंग मुलांसमोर ठेवून शिक्षकांनी, म्हणजे मुलांच्या ‘दादां’नी, मुलांना सांगितले, “हे प्रसंग तुम्ही मुकाभिनयातून दाखवायचे आहेत. व त्या प्रसंगी काय काय कराल हेही दाखवायचे आहे.”

‘दादा मी’ !, दादा-मी’ ! मुलांचे हात उत्साहाने वर गेले. उठून पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू झाला. मुले अभिनय करून दाखवत होती. आपल्या कल्पनेने प्रसंग उभे करत होती, कोणी चुकले की ‘ए, असं नाही, असं करायचं’ म्हणून इतर सहकारी सूचना करत होते. नाटकं करता करता अगदी सहजपणे, मुलांच्या लक्षात आले, वीज ही एक ऊर्जा आहे; गाडी चालवण्यासाठी, माणसाला काम करण्यासाठी ऊर्जा लागते. आपण वेगवेगळ्या साधनांमधून ऊर्जा मिळवत असतो. रोज अवतीभोवती जे घडते त्याची मुलांनी निरीक्षणातून केलेली नोंद आज त्यांना उपयोगी पडत होती. मुले आपली कल्पनाशक्ती लढवत होती. खूप काहीतरी समजल्याचा व खूप मजा केल्याच्या आनंदात, तो अर्ध्या तासाचा पाठ कधी संपला ते मुलांना कळलंच नाही. म्हटले तर अवघड वाटणारा पाठ मुलांच्या सहजपणे लक्षात आणून दिल्याच्या आनंदात ‘दादा’ होते.

तास संपल्याबरोबर मुले धावत आमच्या भोवती गोळा झाली. आतापर्यंत मधून मधून त्यांनी आमच्याकडे पाहून घेतले होते. त्यांनी तयार केलेली ‘भेटकार्ड’ आम्हांला कधी देतो असे त्यांना झाले होते. पाहुण्यांची ओळख करून घेण्याची त्यांच्याशी बोलण्याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावरून, धावत्या हालचालींतून ओसंडत होती. मुलांच्या या कौतुक सोहळ्याचा प्रत्यय आम्हाला सारखा येत होता. खरोखर, वर्गातील आणि वर्गाबाहेरही मुले आनंदात वावरत होती. अभ्यासाचे तणावपूर्ण वातावरण कुठे दिसत नव्हतं.

चिंतनशील नेतृत्व

या आनंददायी वातावरणाचे श्रेय प्रयत्नपूर्वक उभ्या केलेल्या अध्यापन पद्धतीला आहे आणि अशा वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा ध्यास घेतलेल्या शिक्षकांच्या शिकवण्याच्या तळमळीला आहे. शिक्षक व बालकाच्या सुसंवादाला आहे. तसेच ते प्रामुख्याने या गोष्टी प्रेरित करणाऱ्या प्राचार्य श्रीमती लीलाताई पाटील यांच्या चिंतनशील नेतृत्वाला आहे. अध्यापिका, शिक्षक प्रशिक्षक, शैक्षणिक प्रशासनातील अन्य जबाबदाऱ्या आणि शेवटी, ताराबाई अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य अशा आपल्या यशस्वी कर्तृत्वानंतर, निवृत्तीनंतरही काहीतरी अजून करायला हवे, अशा तीव्र जाणिवेत “सृजन आनंद’ची बीजे लावली गेली.

संपूर्ण आयुष्यभर शिक्षण क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्यानंतरही लीलाताईंना शिक्षणपद्धतीविषयी असमाधान जाणवत होते. ‘ज्ञानाविषयी कुतूहल निर्माण करत नाही ते शिक्षणच नव्हे.’ ‘केवळ पुस्तकी अभ्यासक्रमातून मुले यंत्रवत बाहेर पडत आहेत, त्यांच्या संवेदनांना धुमारे फुटतच नाहीत,’ ही जाणीव लीलाताईंना अस्वस्थ करत होती. कुतूहल, जिज्ञासा हा मुलांचा स्थायीभाव असतो, त्याच वेळेस त्याला खतपाणी घातले गेले तर शिक्षणविषयक जिज्ञासा त्यांच्या मनात निर्माण होईल. म्हणून आपण लहान मुलांनाच फुलवलं पाहिजे. शाळेविषयीच्या कल्पना त्यांच्या मनात आकार घेऊ लागल्या व एका संवेदनशील मनातून सृजन आनंद शाळेचा जन्म झाला.

कोल्हापूरच्या ‘आंतरभारती शिक्षण मंडळा’ तर्फे मुक्त सैनिक वसाहतीत ११ जून, १९८५ रोजी सृजन आनंद विद्यालय सुरू झाले. पहिलेच वर्ष असूनही पहिलीच्या वर्गात ४० मुले आली. या विद्यालयात पहिली ते चौथी एकेकच तुकडी आहे आणि प्रत्येक वर्गात पस्तीसच मुले आहेत. मुलांच्या संख्येबाबतचा हा आग्रह प्रथमपासून आणि विचारपूर्वक ठेवलेला आहे. दरवर्षी वाढत १९८८ पर्यंत चौथीच्या वर्गापर्यंत शाळा विस्तारली. मुलांची एकूण संख्या शंभर झाली. मुलांची संख्या १९८९ पासून १९९८ पर्यंत १४२ आहे. संचालक या नात्याने लीलाताईंनी चौथ्या इयत्तेपर्यंत शाळा चालवण्याचे धोरण निश्चित ठरवले. मंडळाने आपल्या धोरणात म्हटले आहे, “देशाची साक्षरता व सुसंस्कृतता वाढवण्यासाठी व टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षणाचे योगदान फार मोठे आहे; यासाठी सहा ते अकरा हा वयोगट निवडून ज्ञान, कौशल्ये आणि वृत्ती यांच्या एकात्मिक विकासाला चालना देणारे शिक्षण देण्याचे ध्येय संस्थेने समोर ठेवले.” या स्तरावरील शिक्षण सर्जनशील व आनंददायी असण्याइतकेच ते विद्यार्थ्याला सभोवारच्या वास्तवाचे आकलन करून देणारे आणि वास्तवाच्या आवश्यक त्या उकलीसाठी त्यांच्या वयांनुसार प्रेरित करणारे असावे.

या उद्देशाने सृजन आनंद विद्यालय सुरू झाले. या उद्देशांचा प्रत्यय मुलांच्या उत्साही, जिज्ञासू वागणुकींतून यावा, सतत येत राहावा, अशी अपेक्षा त्यामागे होती. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे, त्याद्वारा त्यांचे जीवन सफल करण्यास मदत करून त्यांना न्यायोचित व कालोचित अशा समाजपरिवर्तनासाठी सिद्ध करणे हे प्रधान उद्दिष्ट शाळा प्रवर्तकांच्या समोर होते. यासाठी शैक्षणिक प्रयोग हाती घेणे, प्रयोगांतर्गत पुनर्रचनात्मक व नवनिर्माणाची कार्ये हाती घेणे आणि अखेरीस, प्रयोगांती हाती येणारे शैक्षणिक व सामाजिक निष्कर्ष हे, भाषणे चर्चासत्रे, परिसंवाद, प्रकाशने, प्रशिक्षण इत्यादी

माध्यमांद्वारे प्रसारित करणे, ही उद्दिष्टे समोर ठेवून ही शाळा उभी राहिली आहे. शाळा मोठी होऊ लागली. लीलाताईंच्या अपार कष्टातून एक स्वप्न उमलू लागले. लीलाताईंची शालेय प्रयोगावर आधारित ‘पालकपण कधीच संपत नाही’, ‘माध्यमिक शाळा: संचलन व संवर्धन’, ‘संस्कारांचा बागुलबुवा’, ‘शिक्षणातील ओअॅसिस’ आणि ‘शिक्षण घेता घेता’ ही पाच पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अनेक लेखही प्रकाशित

झाले आहेत.

फुलवणारा शिक्षक

आनंद, प्रसन्नता केवळ भव्य इमारतींनी निर्माण होत नसतात, किंवा ते शाळेभोवतालच्या आकर्षक बागेत किंवा शाळेतील सुबक फर्निचर, आकर्षक रचना यात सामावले नसतात, तर ते शिक्षक व मुले यांच्यातील सुसंवादातून फुलते. मुलांना फुलवणारा शिक्षक स्वतः उत्साही असावा लागतो. सदैव नावीन्याच्या शोधात फिरणारा, त्याविषयी भरभरून बोलणारा, प्रयोग करून बघणारा, मुलांमध्ये रमणारा असावा लागतो. अशा वेळेस तो बी.ए.बी.एड्. नसला तरी चालतो. किंबहुना, डी.एड्., बी.एड्. च्या शिक्षणातही कोरडा व्यवहारवाद आल्यामुळे, त्यातून शिक्षकाची प्रयोगशीलता, कल्पकता आणि स्वयंशिक्षणाची प्रेरणा दबली जाण्याचा संभव अधिक.

‘सृजन आनंद’ मधील बावीस शिक्षकांपैकी काही प्रशिक्षित आहेत पण अप्रशिक्षित शिक्षक जास्त आहेत. तसेच पूर्णवेळ काम करणारे म्हणजे प्रत्येक इयत्तेवर काम करणाऱ्या वर्गताई असे थोडे, तर विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळ देऊन काम करणारे शिक्षक जास्त आहेत. काही अल्प मानधन घेणारे तर काही विनामानधन काम करणारे, असे आहेत. अर्थात अप्रशिक्षित व्यक्तींना विद्यालयात शिक्षक म्हणून सहभागी करून घेताना त्यांचे थोडेफार प्रशिक्षण करण्याची जबाबदारी विद्यालयास घ्यावी लागते. व्यक्तिगत मार्गदर्शन, दर आठवड्यास होणाऱ्या शिक्षकसभा, विषय समितीच्या सभा, अनुभवी शिक्षकांकरवी पाठ निरीक्षण, दर्जेदार शिक्षकांच्या अध्यापनाचे निरीक्षण करण्याची दिलेली संधी, संबंधित व्यक्तींशी चर्चा आणि वार्षिक नियोजनाच्या दिवसभराच्या सभा यांमार्फत शिक्षक प्रशिक्षणाचे आवश्यक ते प्रयत्न करतात. हे सर्व शिक्षक मनाने सदैव शालेय कामात गुंतलेले असतात. मुलांच्या विकासाच्या प्रयत्नात असतात. नवे प्रकल्प, नव्या योजना, नवे प्रयोग, पाठ शिकवण्याच्या नव्या पद्धती यांच्या विचारात गुंतलेले असतात. खऱ्या शिक्षकाचे हे लक्षण आहे.

मुलांचा विकास करण्यासाठी आपला विकास होणे गरजेचे असते व मुलांचा विकास घडवण्याच्या प्रक्रियेत शिक्षकाचाही विकास होत असतो, हे सूत्र येथील शिक्षकांनी अंगी रुजवलेले दिसते. कधी कधी लीलाताईंनी दिलेल्या कल्पनाविचारांतून किंवा कधी कधी स्वकल्पनांमधून तर कधी एकमेकांच्या विचारविनिमयातून नवे नवे प्रयोग करण्याची वृत्ती शिक्षकांमध्ये दिसते. स्वविकासासाठी आवश्यक अशी स्वयंमूल्यमापनाची दृष्टी शिक्षकांमध्ये तयार झालेली दिसून येते. परखडपणे स्वतःचे गुणदोष लिहून ते दुसऱ्याला दाखवण्याचे धाडस शिक्षकांमध्ये आहे. एक शिक्षक म्हणून स्वतःच्या वागण्याचे, स्वतःच्या शिकवण्याचे, शिकविण्याच्या पद्धती व आशयाचे मूल्यमापन शिक्षक स्वतः करत असतात, आणि इतरांकडूनही करून घेत असतात. आपल्या जबाबदारीची जाणीव, आपण करत असलेले काम, आपल्या व मुलांच्या आनंदासाठी आहे याचे भान शिक्षकांमध्ये आहे. शिक्षण आनंददायी करण्याच्या शाळेच्या मुख्य प्रेरणेला धरून शिक्षक जात आहेत. त्या प्रेरणेतून अध्यापनाची वेगळी पद्धत तयार झालेली दिसते. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनासाठी शिक्षकांनी अनेक अनुभव निर्माण करावेत अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. शेकडो अनुभव सभोवताली परिसरात साकार होत असतानाच विद्यार्थ्यांचे लक्ष तिकडे वेधणे हे काम शिक्षकांनी जाणीवपूर्वक करायचे असते.

एकदा विद्यालयात येताना रोहिणीताईंनी बैलाला नाल ठोकत असल्याचे पाहिले. नित्य दिसणारी ही घटना. पण या शिक्षिकेने त्याचा सर्जक वापर केला. त्यावेळी त्या चौथ्या इयत्तेत विज्ञान विषयात प्राणिजीवन हा भाग शिकवीत होत्या. खुराला नाल ठोकणे हा विषयाला अनुकूल असा शैक्षणिक अनुभव ठरेल असे त्यांना वाटले. मग त्या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन तेथे गेल्या. विद्यार्थ्यांनी नीट निरीक्षण करून अनेक प्रश्न विचारले, शंकानिरसन केले. स्वयंअध्ययनाचा एक आदर्श पाठ त्यातून तयार झाला.