adhyapan uddishth

अध्यापन उद्दिष्ट

अध्यापन उद्दिष्ट

विद्यार्थ्यांना भोवतालच्या समाजपरिस्थितीचे भान आणून देणे, त्याला सामोरे जायला बळ निर्माण करणे व बदल घडवून आणण्याची प्रेरणा निर्माण करणे हे अध्यापनाचे उद्दिष्ट म्हणून सृजन आनंद विद्यालयाने मानले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यात नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्यांची जाणीव निर्माण होते, सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून स्वकेंद्री वृत्तीत समाधान मानणारी, आज समाजात सार्वत्रिकरीत्या दिसून येणारी वृत्ती बदलण्याचा थोडासा प्रयत्नही त्यातून साधला जातो. समता, बंधुता, न्याय अशा मूल्यांचा अर्थ मुलांना अशा घटनांमधून सहजपणाने आणि जाता जाता कळतो व ती मूल्ये जपण्यासाठी मुलांकडून नेटाने नि जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू होतो. आता मुले आपल्याच वर्तणुकीचे मूल्यमापन करू लागतात. आपण रडके, हसरे, चिडके, आनंदी; कसे आहोत हे मुले शोधतात. आपण दुसऱ्याच्या शब्दांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये हे मुलांना कळते. आतापर्यंत आपण वाईट मानत आलेल्या मुलाने आपल्याला सहलीच्या वेळेस मदत केली, हे लक्षात येऊन आपली चूक सुधारण्याचा व त्यालाच चांगला दोस्त मानण्याचा समजूतदारपणा चौथीच्या वर्गातील एका मुलाने दाखवला आहे. “परीक्षेत मी हा भाग दुसऱ्याचा पाहून लिहिला आहे याचे मार्कस् मला देऊ नका,” किंवा “चित्राखाली मी स्वतःच बाबांची सही केली आहे, तेथे मला शून्य गुण द्या” प्रामाणिकपणे कबूल करण्याचा समूजतदारपणा मुलांमध्ये आला आहे. शिक्षक जसे स्वतःचे परखड मूल्यमापन करत असतात, तशीच ही मुलेही करत असतात. जीवनातील मूल्यांचे बीज त्यांच्यात हळुहळू रुजलेले दिसते.

सूर्यकिरण जसे वेली- वृक्षांच्या पानापानांमधून ऊर्जारूपाने साठतात, तसे मूल्यसंस्कार विद्यार्थ्यांच्या वृत्तींतून जीवनभरासाठी मुरले जातात. उदाहरणार्थ, विद्यालयात मुलांच्या एकत्र झालेल्या वाढदिवसाला पालकांनी आणलेल्या गोळ्या मुलांनी उत्स्फूर्तपणे नाकारल्या. “आम्ही वाढदिवसाला गोळ्या वाटत नाही”, हे पालकांना नम्रपणे सांगण्यात आले. स्कॉलरशिप परीक्षेच्या वेळेस बाहेरच्या शाळेतील एक शिक्षक एका मुलीला मदत करत आहे, याची तक्रार या शाळेतील एका चिमखडीने धाडसाने नोंदवली. या शाळेतून बाहेर पडलेली मुले दुसऱ्या शाळेतील मुलांमध्ये सहज रमतात, सहकार्यान वागतात असेही अभिमानास्पद चित्र दिसते. मूल्य संकल्पनेत गांधी जयंतीच्या दिवशी स्वदेशीची संकल्पना एका नव्या विचारातून रुजवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला. वेखंड, तुळस, आले, लसूण अशा वनस्पतींची मुलांना ओळख करून देऊन छोट्या छोट्या आजारांवर त्याचा कसा उपयोग होतो व महागडी औषधे कशी टाळता येतात हे मुलांच्या पातळीवरून समजावून दिले. ‘देतो तो देव’ हा धडा शिकवताना ‘देवत्व’ व ‘राक्षसत्व’ याबद्दलची मांडणी करताना भूदान, देहदान इत्यादींची सविस्तर चर्चा वर्गात करून नव्या मूल्यसंस्कार रुजवण्याचा प्रयत्नही शिक्षकांनी केला आहे. संस्कार या वयातच रुजू, फुलू शकतात याचे महत्त्व शिक्षकांनी ओळखले आहे व वेगवेगळ्या मार्गांनी मूल्यसंस्कार करण्याचा प्रयत्न विद्यालयात होतो आहे. विद्यार्थ्यांचा वृत्तिविकास व त्यांच्यामधील मूल्यविकास हाच शिक्षणाचा मूळ गाभा आहे, ही श्रद्धा विद्यालयाने प्रथमपासून ठेवली आहे. त्यामुळे दरवर्षी या दिशेने विद्यार्थ्यांना नेणारे अनेक उपक्रम अंमलात आणले जातात. ‘मिठाबाबतचे सत्यशोधन’, ‘स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव’, ‘कष्टकरी मुलांच्या जीवनाचा प्रत्यक्षानुभव घेणे’, ‘वर्तमानपत्रांच्या माध्यमातून नागरिकत्वाचा अभ्यास’ अशी अलिकडची काही उदाहरणे त्यासाठी देता येतील. येथे वेळापत्रकात मूल्यशिक्षणाचा वेगळा तास ठेवावा लागत नाही. शिक्षकाला मूल्यवर्गाच्या प्रशिक्षणातूनही जावे लागत नाही.

विविध अध्यापन पद्धती

तुम्ही एरवी कुठल्याही शाळेतल्या कुठल्याही वर्गात जाऊन पाहा. सामान्यतः इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित या विषयांमधील पाठ अधिकत्वाने रुक्ष, बोजड असे वाटतात. इतिहासात गोष्टी असल्या तरी नामावली सनावळी व वर्तमानाशी त्यांची तुटलेली नाळ, नागरिकशास्त्रातील बोजड माहिती, भूगोलातील भारंभार माहिती, वस्तू, पिके, उद्योगधंदे, गावे यांच्या लांबलचक याद्या, गणितातल्या अमूर्त संकल्पना या विविध बाबी वर्गात जेव्हा फक्त वाचून दाखवल्या जातात, तेव्हा ते ऐकण्याविषयी फक्त अनास्था निर्माण होते. धड्यात सांगितलय म्हणून ते मान्य करायचे व पाठ करायचे. त्या पाठांचा शाळेतील जीवनाशी, शाळेबाहेरील जीवनाशी, घरातल्या वातावरणाशी, भोवतालच्या परिसराशी काही संबंध नसेल तर मिळणारे ज्ञान निरुपयोगीच ठरते. खरे तर माहिती, अनुभव नि अनुभूती यांचा परस्परांशी संबंध जोडला जातो तेव्हा ज्ञानाची प्रक्रिया पूर्ण होते. ऐकणे, प्रत्यक्ष कृती करून बघणे, त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे व दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांशी उपलब्ध माहितीचे अर्थसंदर्भ जोडून बघणे, पुनःपुन्हा एकेका घटकाने, त्याच्या भोवतालचे अधिक ज्ञान मिळवणे, या ज्ञानप्रकियेचे योग्य भान ठेवून, येथे अध्यापन पद्धती तयार केलेली दिसते. एखादा पाठ मग आठवडाभरही चालतो, तर कधी एकच पाठ दोन-तीन शिक्षक मिळून शिकवतात.

दुसरीतील मराठीच्या पाठ्यक्रमातील ‘फणस’ ही विनोबाजींची गोष्ट शिकल्यानंतर मुलांना काटेरी व आतून गोड असलेला फणस खायला दिला जातो. हस्तव्यवसायाची शिक्षिका येऊन फणसाची तीन पाने घेऊन पत्रावळ जोडायला शिकवते. आपण तयार केलेल्या पत्रावळीतून मुले मग दुपारचा डबा खातात. अशा प्रकारे एक ना अनेक मार्गांनी, कल्पकतेने कोकणातल्या फणसाची सारी रूपे वर्गात मुलांना अनुभवायला मिळतात. झाड प्रत्यक्ष बघण्याची जिज्ञासा मुलांमध्ये निर्माण होते. फणसाचे इतर पदार्थ करून मुलांना खायला घालण्याचा, झाड दाखवण्याचा गृहपाठ पालकांना दिला जातो. शाळेतल्या धड्याचा संबंध मुले अशी आपापल्या परिसराशी नि घराशी जोडतात. घरातील मोठी माणसेही मुलांच्या अभ्यासात प्रत्यक्ष सहभागी होतात; आणि मंग शिक्षक-बालक-पालक या तिपेडी विणीतून ज्ञानाचे धागे घट्ट विणले जातात.

इतिहासाचे धडे या शाळेत गोष्टीरूप होऊन अवतरतात. वर्तमानकाळ व भूतकाळ यांची तुलना केली जाते, बदललेल्या परिस्थितीचे मुलांना भान आणून दिले जाते. पुस्तकातील नागरिकशास्त्राला पुस्तकाचे बंधन राहात नाही. चांगला नागरिक होणे म्हणजे छान; चांगला माणूस होणे म्हणजे सर्वांशी प्रेमाने वागणारा, सर्वांना मदत करणारा, देशाविषयी प्रेम-अभिमान बाळगणारा, देशात काय घडतेय ते बघणारा जाणून घेणारा, रहदारीच्या स्वच्छतेच्या नियमांपासून ते देशातील कायदे जबाबदारीने पाळणारा माणूस होणे, हे मुलांवर पहिलीपासून बिंबवले जाते. स्वच्छतेचे, रहदारीचे, सहकाराचे नियम शिकणारी पहिलीतील मुले चौथीपर्यंत नागरिकशास्त्र शिकणे आणि चांगला नागरिक होणे यांतील फरक समजावून घेऊ शकतात, आपण मोठे झाल्यावर मतदार म्हणून कसे वागू याबद्दल आपली मते नोंदवू शकतात. उदाहरणार्थ, ‘लाच घेऊन मतदान करणार नाही, जो उमेदवार लोकांची काळजी घेणारा असेल त्यालाच मत देईन.’ इतिहासातील प्रजाप्रेमी शिवरायाची प्रतिमा ते आपल्या नेत्यात शोधतात. एका विषयातील ज्ञान असे दुसऱ्या विषयाच्या अभ्यासात त्यांना उपयोगी पडत असते. ते तसे जोडण्याची क्षमता हळुहळू मुलांमध्ये निर्माण होऊ लागते. चौथीतली छोटी सई म्हणते, “दंगलीत सामील होणार नाही, दंगलीत सामील होणाऱ्यांना समजावून सांगीन” हे मत नोंदवणाऱ्या सईच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक वाटते. हे मत नोंदवत असताना कदाचित तिला शाळेत झालेली दंगलीविषयीची चर्चा आठवत असेल. आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने जुलै १९९७ मध्ये मुंबईत उसळलेल्या दंगलीनंतर शाळेत एक कार्यक्रम घेतला गेला. यातून शिक्षकांनी शोध घेतला, की बाहेर घडणाऱ्या घटना मुलांपर्यंत पोचतात का, मुलांच्या मनात त्याविषयी काही प्रतिक्रिया उमटतात का? त्यावर ते काही विचार करतात का ? त्यासाठी भिंतींवर वृत्तपत्रातील दंगलीविषयक कात्रणे लावली, मुलांना रेडियोप्रमाणे बातम्या ऐकवल्या गेल्या. दंगलीत सापडलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या. मुले त्या कार्यक्रमात चांगली सहभागी झाली. त्यांनी प्रश्न विचारले. दंगलीचा निषेध केला. दंगलीचे परिणाम भयानक होतात याची जाणीव निर्माण झाली. दंगलीपेक्षा सहकार, मैत्री, समजावून घेणे महत्त्वाचे वाटले. म्हणूनच सईची प्रतिक्रिया ही तिच्या मनात असलेली दंगलीविषयीची घृणा व व्यावहारिक समजूतदारपणा दाखवते.

गणिताच्या संकल्पना शिक्षकांनी तयार केलेल्या साधनांच्या माध्यमातून शिकवल्या जातात. गटागटांतून मुले साधनांच्या आधारे गणित सोडवत बसलेली दिसतात. प्रत्यक्ष कृतीमुळे गणितातील अमूर्त संकल्पना त्यांच्यासमोर मूर्त होतात. गणितातील आकडेमोड व गणितातील क्रिया शिकवताना गणित व जीवन यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न शिक्षक सतत करीत असतात. उदाहरणार्थ, एकदा शिक्षकांनी वाटणी करताना कोणती दृष्टी समोर ठेवायची याचा विचार करताना मुलांना प्रश्न विचारला, “महेशला डोळ्यांचा त्रास आहे. डॉक्टरांनी पपई खाण्यास सांगितले आहे. घरात चार माणसे आहेत तर महेशला पपईचा पाव भाग देणे योग्य होईल का ?” अशा प्रश्नांची उत्तरे शोधत असताना मुलांच्या मनात केवळ गणिताचा हिशेब येत नाही तर समानता, सहभावना, दुसऱ्याची गरज समजावून घेणे अशा मूल्यविचारांचाही ठसा नकळत त्यांच्या मनावर उमटत असतो. ज्ञानाला मूल्यशिक्षणाचे अधिष्ठान आपोआपच प्राप्त होते.

सृजनआनंद विद्यालयात प्रत्येक विषयाच्या अध्यापनात वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जात आहेत. सामाजिकदृष्ट्या अर्थपूर्ण, सर्जनशील व आनंददायी अशी अध्ययन अध्यापन पद्धत हा या विद्यालयातील शिक्षणपद्धतीतला केंद्रबिंदू आहे. मग त्यासाठी विविध कृती कार्यक्रमांद्वारे व नाटुकली, स्लाइड शो, बोलक्या बाहुल्या, खेळ, विविध भाषिक व गणिताचे खेळ, कोडी, उखाणे अशी एक ना अनेक तंत्रे वापरली जातात. या तंत्राचा वापर करताना विषय आकर्षक करणे, मुलांना तो सहज आत्मसात होणे व त्या विषयाच्या अधिक ज्ञानासाठी मुलांनी आपणहून प्रयत्न करणे; हे निकष महत्त्वाचे मानले जातात. शिक्षकालाही आपली स्वतःची अध्यापनतंत्रे ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते आणि इथेच नेमका शिक्षकाच्या अध्यापनातील कल्पकतेला नि प्रयोगशीलतेला पूर्ण वाव मिळतो. शिक्षकांची अशी कल्पकता मग वर्गावर्गांतून दिसू लागते. भाषा शिकत असताना पहिलीच्या वर्गात स्वरचिन्हांच्या दृढीकरणासाठी शिक्षकांनी छोटी गाणी तयार केली आहेत. यातून मुले ‘ए’कार शिकतात. गाणे कसे तयार होते याची मजा अनुभवतात. चांगल्या सवयी सहज लक्षात राहतात.

खूप खूप काम हवे हवे

नेहमी हसणे हवे हवे हळू बोलणे हवे हवे

किंवा अक्षर दृढीकरणासाठी या शाळेतील शिक्षकांनी ‘अक्षर शोधा’ गाणी तयार केली आहेत. मुले नव्याने विद्यालयात आल्यावर एखादे अक्षर शिकवण्यासाठी सुद्धा अशी गाणी तयार झाली आहेत. उदाहरणार्थ, मुलांच्या मनावर ‘च’ बिंबण्यासाठी पुढील बडबडगीत उपयोगात आणले गेले आहे.

चुरचुरीत चिवडा चाव

चमचमीत चाट चाख

चटकमटक चकली चघळ

‘च’ शोधताना विद्यार्थी पदार्थांच्या रूपाची व चवीचीही मजा अनुभवतात, इथेच तर शिक्षण ‘आनंददायी होते. या विद्यालयाचे वैशिष्ट्य असे आहे, की आशयविकासाबरोबरच मूल्यविकास साधणारी अनेक गाणी वापरली गेली आहेत, गाण्यांचा असा प्रथमपासून हेतूपूर्वक प्रभावी उपयोग केल्यामुळे मुलांच्या मनात स्वरचिन्हांचा गालिचा विणला जातो व बघता बघता ‘चित्र’ तयार होते. आकार, इकार, उकार, एकार यांची चिन्हे मुलांच्या हातून घोटली जाऊन त्यांना वळण मिळते. ‘दहा वेळा उकार काढा, दहा वेळ एकार काढा’ असे गृहपाठ देऊन अभ्यास कंटाळवाणा करण्यापेक्षा या उपक्रमांमधून मुलांकडून जे अपेक्षित आहे ते साधले जाते. मुलांचा अभ्यासातील उत्साह वाढवण्यास मदत होते.

एखादा शिक्षक वर्गात मुलांना सांगतो ‘स’च्या वस्तूंची चित्रे काढा! मग मुलांना ‘स’ वरून सुरू होणाऱ्या शब्दांचा शोध घ्यावासा वाटतो. चित्रे आणि शब्दसंग्रह वाढवणे, या दोन्ही गोष्टी यातून एकदम साधल्या जातात. दुसरीच्या वर्गामध्ये चित्र व एखादे अक्षर यांतून शब्द तयार करण्याचा शब्दखेळ भिंतीवर लावलेला होता. मुले अतिशय उत्साहाने शब्द गोळा करत होती. नवीन सापडलेला शब्द वाक्यात वापरून दाखवत होती. शब्दांच्या गमती अनुभवत होती. भाषेला आपले करत चौथीपर्यंत कल्पनाशक्तीला छान टोक आले आहे आणि मुले विविधांगी अभिव्यक्तीही साधू लागली आहेत. ‘रडणाऱ्या आरशाचे मनोगत’, ‘आवडता खेळ’ ‘अनुभवलेले- पाहिलेले’, ‘आमचे वर्गाचे निश्चय’ अशा विषयांवर मुले मुक्तपणे लिहितात. कवी- लेखकांची ओळख करून घेतात. पाठ्यपुस्तकांपेक्षा वेगळी पुस्तके वाचू लागतात. काव्यानंदात रमू लागतात. एखाद्या विषयाचे बोट पकडून त्या विषयाचा शोध घेत पुढे जायचे असते, केवळ दिलेल्या विषयाच्या मर्यादेत थांबायचे नसते, ही प्रक्रिया येथे सुरू होते. ज्ञानग्रहण करण्याची क्षमता अशा तऱ्हेने हळुहळू विकसित करायची असते. मग त्यातून ज्ञानाचा उपयोग कोठे व कसा करायचा याचेही भान विद्यार्थ्यांना येत जाते. हा शिक्षणविषयक धडा सृजनआनंदने आपल्या कृतीशील शिक्षणपद्धतीतून इतरांसाठी दिला आहे.

सर्व शाळांच्या वार्षिक नियोजनात असलेल्या सण, उत्सव, सहली यांसारख्या कार्यक्रमाचा ‘सृजनआनंद’ विद्यालयाने बारकाईने विचार केलेला दिसतो. त्या कार्यक्रमांमधून पालकांना जाणीवपूर्वक सहभागी करून घेतलेले आहे. उदाहरणार्थ, ‘रंगपंचमी’ सारखा सण मुले, शिक्षक, पालक मिळून साजरा करतात. ‘नागपंचमी’ सणाऐवजी ‘सापपंचमी’ हा सण साजरा केला जातो. सापाची चित्रे काढली जातात. मातीचा, पिठाचा, रांगोळीचा साप करून बघितला जातो. मुलांना सापांच्या जाती, विषारी-बिनविषारी इत्यादी सापांची ओळख करून दिली जाते. प्रत्यक्ष सापाला हात लावायला देऊन त्याविषयीची भीती पळवण्याचा प्रयत्न होतो. सणांची योग्य माहिती मिळवणे, पारंपरिक सणांना, त्यातील विचाराला, नव्या विचाराशी जोडून घेणे, अशा

प्रकारे सणांना वैज्ञानिक दृष्टिकोनाचे परिमाण दिले जाते. सहली हा अध्यापनपद्धतीचा एक अविभाज्य भाग झाला आहे. रंजन व शिक्षण या दोन्ही प्रक्रिया परस्परांशी जोडण्याचे काम सहलींमधून प्रभावीपणे होते. भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, परिसर अशा कितीतरी विषयांना सहलींच्या माध्यमातून स्पर्श करता येतो. निसर्गात मुक्तपणे फिरत असताना मुलांची नजर सौंदर्य टिपायला शिकते. समूहाने काम करण्याची वृत्ती तयार होते. सहकार्याची भावना वाढीस लागते. धाडस वाढते. परिसराची अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू होतो. मुलांच्या उत्स्फूर्त क्रिया-प्रतिक्रियांतून व नंतर वर्गात सहलींविषयी झालेली प्रश्नोत्तरे, निबंध यांतून भाषाविकास साधत असतो. मुलांच्या अनुभवाला नेटक्या शब्दांत मांडायला लावण्यासाठी येथील शिक्षक प्रयत्नशील झालेले दिसतात. शिक्षक स्वतः बारकाईने सहलीच्या आधी व नंतरही सहलीच्या ठिकाणाचा विचार करतात. देण्यासारखे व घेण्यासारखे खूप काही असते याचा विचार शिक्षकांच्या मनात सतत असतो.

मुलांच्या कलागुणांना, विचारांना अभिव्यक्तीची संधी मिळावी म्हणून मुलांना स्वतःला पुस्तके तयार करायला सांगितली जातात. मुले मग पुस्तकासाठी चित्रविचित्र कल्पनांमधून साकार झालेली चित्रे काढतात. उदाहरणार्थ, वाघ सापाला घाबरतो, पतंगाऐवजी मुले आकाशात उडतात, इमारतींवरून वाहने धावतात. चित्राप्रमाणेच, मुलांचे शब्द कवितेतही बद्ध होतात. चिमुकल्या कथा किंवा संवाद तयार होतात. मुले आपापले छोटे छोटे अनुभव लिहून काढतात. चिमुकल्या विश्वात दडलेले असंख्य विचार कागदांवर उत्स्फूर्तपणे उमटू लागतात.

मुलांच्या चित्रात्मक, काव्यात्मक अभिव्यक्तीने मग भिंती बोलू लागतात. मुलांनी दर आठवड्याला मांडलेल्या प्रदर्शन कोपऱ्यात त्यांच्या या याऱ्या धडपडीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले दिसते. दर आठवड्याला एकेका गटाला एकेक विषय देऊन ‘प्रदर्शन कोपरा’ सजवायला दिला जातो. प्रदर्शनाची मांडणी, विषयाची चित्र, काव्य, तक्ते यांमधून आकर्षकरीत्या दिलेली माहिती हे सर्व मुले आपल्या कल्पनांतून करतात. त्यांचे ‘ताई’, ‘दादा’ त्यांना थोडे मार्गदर्शन करतात. अभिव्यक्तिक्षमता, आत्मविश्वास, विषयाचे आकलन करून घेण्याची योग्य दिशा शोधता येणे या साऱ्यांची यातून जोपासना होते.