अनिल रायपूरकर माणुसकी जपणारा अधिकारी
खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा ते इंडिकासारख्या अवाढव्य आणि आधुनिक कारखान्यातील ४,००० कोटी रुपयांची खरेदी करून उत्पादन अव्याहत चालू ठेवणाऱ्या जनरल मॅनेजरपर्यंतचा रायपूरकरांचा प्रवास मोठा रोमहर्षक आहे.
अनिल रायपूरकर यांचा जन्म ३१ मार्च १९४९ रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण यथातथाच पार पडले. आपली मोठी जमीन असून ती कूळकायद्यात अडकलेली आहे. त्यामुळे आपण आता खूप अभ्यास करून उत्तम नोकरी मिळवायला पाहिजे, ही जाणीव त्यांना झाली आणि ते नेटाने अभ्यासाला लागले. या प्रयत्नामुळे ८ वीत त्यांनी दुसरा नंबर पटकावला. त्यामुळे अभ्यास आणि शाळा नवीन उत्साहाने सुरू झाली. माध्यमिक शाळेत असताना श्यामकांत धर्माधिकारी आणि बाजीराव पाटील या मुलांशी त्यांच्याबरोबर खूप दोस्ती जमली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तिघांतही वर्गातील पहिला नंबर पटकावण्यासाठी सतत स्पर्धा असे; पण या स्पर्धेमुळे त्यांच्यात द्वेष किंवा मत्सर कधीही निर्माण झाला नाही. खूपच सकारात्मक स्पर्धेच्या वातावरणात त्यांनी एकत्र अभ्यास केला. याच दरम्यान ‘दोस्ती’ आणि ‘नजराणा’ हे हिंदी चित्रपट त्यांच्या पाहण्यात आले. याचा परिणाम म्हणजे ते आपले मित्र आणि भाऊ, बहिणी यांच्याबरोबर खूप प्रेमाचे संबंध प्रस्थापित करू शकले.
माध्यमिक शिक्षण चालू असतानाच त्याचे घरी रमण पाटील यांची लग्नपत्रिका आली. त्यावर त्यांनी मोठ्या दिमाखाने बी.ई. अशी पदवी छापली होती. तेव्हापासून रायपूरकर यांच्या मनात आपणही बी. ई. झालेच पाहिजे, ही
ईर्षा निर्माण झाली. शाळेतील एका स्नेहसंमेलनात त्यांच्यावर बक्षिसांचा पाऊस पडला होता. त्या वेळच्या त्यांच्या बक्षिसांची
एकूण रक्कम शंभर रुपयांच्या घरात गेली होती. बक्षीसविजेत्या प्रत्येक एक-दोन नावांनंतर ह्यांचे नाव पुकारले जायचे मोठीच गंमत म्हणजे त्यांच्या पालकांना याची काहीच कल्पना नव्हती. घरातील मोलकरणीकडून त्यांना नंतर ही बातमी समजली.
अकरावीच्या परीक्षेनंतर त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयात शास्त्रशाखेत प्रवेश घेतला आणि याच
महाविद्यालयाच्या वसतिगृहात ते राहू लागले, महाविद्यालयाच्या सहामाही परीक्षेत एक मोठाच धक्का त्यांना बसला.
त्यांना गणिताच्या पेपरमध्ये शून्य मार्क्स मिळाले होते. गणितासाठी विशेष शिकवणी लावण्यासाठी घरून स्पष्ट नकार मिळाला. त्या वेळी त्यांनी स्वतःच अभ्यास करण्यासाठी कंबर कसली आणि महाविद्यालयाच्या पुढील परीक्षेत त्यांनी पहिला क्रमांक पटकावला, मला असे वाटते, की या प्रसंगामुळे रायपूरकरांचा स्वभाव जिद्दी झाला ● असावा आणि त्याचा उपयोग त्यांना आयुष्यातील अनेक गोष्टी जिद्दीने मिळवण्यात यश आले आहे. त्यांना मनापासून सैन्य किंवा पोलिसात नोकरी करावी अशी इच्छा होती. त्यांच्या मोठ्या भावाला इंजिनिअर व्हावयाचे होते, पण ते होऊ शकले नाहीत. म्हणूनही त्यांनी आपण इंजिनिअरच व्हायचे हे पक्के ठरवले असावे.
औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळवत संपादन केली. त्या वेळी इंजिनिअर्सना नोकरी मिळणे जरा अवघडच होते. नाशिक येथील एका लघुउद्योगातील टूल रूममध्ये त्यांना सरकारी योजनेंतर्गत ट्रेनी इंजिनिअर म्हणून काम मिळाले. शाळा-कॉलेजात असताना ते नेहमीच ए. सी. सी., एन्. सी. सी. अशा उपक्रमात सामील होत असत. या उपक्रमांमुळेच त्यांच्यात खेळ, नेतृत्वगुण आणि देशप्रेमाबरोबरच लोकांमध्ये मिळून-मिसळून वागण्याची कौशल्ये निर्माण झाली. नाशिकच्या नोकरीत मिळणारा पगार अगदीच तुटपुंजा होता. नोकरी लागल्यावर घरून पैसा मागायचा नाही, हा निर्णयही पक्का होता. तेव्हा काही मित्र आणि इतर लोकांबरोबर मैत्रीचे आणि सहानुभूतीचे संबंध निर्माण करून हा काळ कसा मजेत घालवला याचे अनेक गमतीदार किस्से त्यांच्याजवळ आहेत आणि ते किस्से आपल्या मित्रमंडळींना रायपूरकर मोठ्या रंजकतेने सांगत असतात. ते इथे लिहिण्यापेक्षा त्यांच्या तोंडून ऐकण्यातच खरी खुमारी आहे, गंमत आहे. आपल्या वसतिगृहातील आणि नाशिकमधील वास्तव्यामुळेच आपण कोणत्याही परिस्थितीत आयुष्य आनंदाने कसे जगायचे, याचे उत्तम धडे घेऊन मोठा मित्रपरिवार जमविला, असे ते मानतात.
त्यांना टाटा मोटर्समध्ये १९७३ साली त्या वेळच्या ग्रोथ डिव्हिजनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तेथील मशिन शॉपमध्ये शिफ्ट इन्चार्ज म्हणून त्यांना काम मिळाले. त्याच्या नियंत्रणाखालचे सर्वच कामगार त्यांच्यापेक्षा वयाने बरेच मोठे होते आणि कामातील त्यांचा अनुभवही जास्त होता; परंतु सर्वांशी उत्तम संबंध प्रस्थापित करून रायपूरकरांनी उत्तम कामगिरी करून दाखवली; टाटा मोटर्समध्ये एक दीर्घकालीन संप उद्भवला होता. त्या वेळी नियंत्रण कक्ष सांभाळणे, वाहतूकव्यवस्था आणि बसेसची सुरक्षा यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. सर्वसाधारणत: सर्वच बाबतीत कंपनी या काळी मोठ्या स्थित्यंतरातून जात होती. त्यामुळे व्यवस्थापकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात रायपूरकरांची बदली ग्रोथ विभागातून मटेरियल पर्चेस विभागात झाली.
मला आजही आठवते सर्व मित्रमंडळी त्याच्या नवीन कामाचं भाषांतर भंगार विक्री, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा गणवेश, हातमोजे, पायमोजे’ व्यवस्थापक म्हणून करीत असत. अर्थात, रायपूरकर मात्र या बदलाकडे खूप सकारात्मकदृष्टीने पाहात होते. हे कामही त्यांनी खूप निष्ठेने केले. या कामामुळे त्यांचा समाजातील आणि कंपनीतीलही विविध स्तरातील लोकांशी संबंध आला. त्यांचे दृष्टिकोन, कंपनीबद्दलची त्यांची वागणूक यांचा अभ्यास करता आला, भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. आपण या कामामुळेच कंपनीच्या अधिक जवळ आलो आणि आपल्यालाही एक वेगळीच सामाजिक प्रतिष्ठा मिळाली असे त्यांना वाटते. येथेही त्यांनी सर्व संबंधित लोकांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले आणि ते जोपासलेही. या कामामुळेच कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत रायपूरकरांची सचोटी, कामातील बांधीलकी आणि गुंतवणूक लक्षात आली. आपण हे काम स्वीकारताना आपला दृष्टिकोन काय होता ? या प्रश्नाला अगदी स्पष्ट शब्दांत त्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “आपल्या वाट्याला नेहमीच आपल्याला आवडणारेच काम येईल असे सांगता येत नाही, परंतु जे काम आपल्याला मिळेल ते आपल्याला आवडीने करता आलं पाहिजे, हाच माझा विचार होता. हेही काम मी खूप आवडीने आणि जबाबदारीने केले. कारण काम कोणतेही असो, ते आपण कसं करतो हेच महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक कामात सुधारणेला खूप वाव असतोच असतो, यावर माझी श्रद्धा आहे.”
त्यांच्यातील सच्चेपणा, कठोर मेहनत करण्याची तयारी आणि उच्च पातळीची सचोटी या गुणांमुळे कंपनीच्या इंडिका गाड्यांचे उत्पादन करणाऱ्या टीममध्ये त्यांची निवड मटेरियल आणि लॉजिस्टिक्स् या विभागात झाली. सुरुवातीला ही संपूर्ण डिव्हिजनच नव्याने उभारायची होती. कामात नवीन विचारसरणी तर होतीच, सर्वच गोष्टी टीम मेंबर्सनी आव्हान म्हणूनच स्वीकारलेल्या होत्या. असे असले तरी दैनंदिन कामात अनंत अडचणी येत होत्या आणि त्या सोडवाव्या लागत होत्या. एकदा तर संपूर्ण भारतातच वाहतूक कंपन्यांचा मोठा संप झाला होता. भारतातील अनेक ऑटो कंपन्यांत मालाच्या योग्य पुरवठ्याअभावी काही दिवस उत्पादन बंद पडले होते. परंतु आमच्या विभागाने कंबर कसून काम केले आणि ‘इंडिका’ या गाड्यांचे उत्पादन बंद पडू दिले नाही, असे रायपूरकर मोठ्या अभिमानाने सांगतात. अशीच एकदा इंडिका उत्पादनातील पेंट शॉपला प्रचंड मोठी आग लागली आणि संपूर्ण पेंट शॉप निकामी झाला होता. इंडिकाची मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे उत्पादन थांबवणे ग्राहकांच्या आणि कंपनीच्याही हिताचे नव्हते. त्या वेळी मुंबईतील कुर्ला येथील फियाट कंपनीच्या पेंट शॉपमध्ये इंडिकाचे पेंटिंग करून घेतले आणि चार ते पाच दिवसांच्या अवधीत ट्रान्सपोर्टची सर्व व्यवस्था नीट करून इंडिका गाड्यांचे प्रॉडक्शन अखंडितपणे सुरू ठेवले.
सप्लाय चेन व्यवस्थापन या कामाला तासांची मर्यादा नसते. हे काम चोवीस तास सुरू असते. त्यामुळेच काम हे एक ‘टीम वर्क’ आहे. यासाठी मी उत्तम टीम विकसित करू शकलो हे मोठे समाधान होते. हाताखालील माणसांना त्यांची उद्दिष्टे, त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा मी नेहमीच स्पष्टपणे सांगत असे, परंतु त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी मात्र मी स्वतः कटाक्षाने सोडवीत असे. यासाठी वरिष्ठ आणि हाताखालचे कनिष्ठ अधिकारी यांच्यात समन्वय घालणे खूपच कौशल्याचे असते. या सर्व गोष्टी आपण कशा हाताळल्या, यावर असे ते म्हणाले. “शूर माणसालाच नशीब साथ देते” आणि ‘इच्छा तेथे मार्ग’ ही माझी मार्गदर्शक तत्त्वे होती. कोणत्याही समस्येसाठी मी नेहमीच तीन उत्तरे तयार ठेवीत असे आणि त्यातला एकाचा उपयोग नक्कीच होत असे. मिळालेल्या यशाचे श्रेय मी नेहमीच माझ्या हाताखालील लोकांना देत असे आणि पराजयाची जबाबदारी स्वतःवर घेणेच नेहमी पसंत करीत असे. माझी पत्नी सुनीता हिने मला एक मोलाचा सल्ला दिला होता, जे होते आहे ते नेहमीच चांगल्यासाठी, असे समजा! परिस्थितीशी सदैव लढत राहा. शस्त्रे कधीच मान खाली ठेवू नका आणि वडिलांनी- आयुष्य हे पुस्तकासारखे आहे. पुस्तक निवडता येते, पण त्याची पाने निवडणे तुमच्या हातात नाही दिलेली ही मार्गदर्शक तत्त्वे मी आयुष्यात तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केला. आयुष्याच्या जडणघडणीत आपल्या आईचाही मोलाचा वाटा आहे, याची आठवणही त्यांनी करून दिली.
टाटा मोटर्समध्ये शेवटी ते ‘हेड मटेरिअल्स डिव्हिजन’ म्हणून काम पाहात होते. मटेरिअल्सचे सर्व डिपार्टमेंट्स त्याच्या नियंत्रणाखाली होते. इंडिका उत्पादनासाठी लागणारे ४,००० कोटींच्या मटेरिअलची खरेदी त्यांच्या नेतृत्वाखाली होत होती. अर्थात, या प्रचंड कामाच्या ढिगाऱ्यामुळे आपण फारसे वाचन आणि समाजकल्याणाची कामे करू शकलो नाही, याचीही खंत त्यांना आहे. मात्र टाटा मोटर्सच्या कामात ते पूर्ण समाधानी आहेत. एवढी मोठी खरेदी करताना अनेक मोहाचे प्रसंग आले असणार या माझ्या विधानावर रायपूरकर जरा गंभीर झाले पण लगेचच त्यांनी स्पष्ट केले की, काही बाबतीत मी एक स्वच्छ सीमारेषा घालून घेतली होती ती म्हणजे इंडर लोकांकडून फक्त अशीच गोष्ट स्वीकारायची की ती जर कोणी मागितली तर अगदी सहजपणे त्याला ती देता यावी आणि ही गोष्ट आमच्या ‘टाटा कोड ऑफ कंडक्ट्स’ मध्येही बसत होती.
त्यांच्या मुली स्वप्ना, स्मिता या संगणक तंत्रज्ञानातील उच्चशिक्षित आहेत. आपल्या व्यवसायातील गुंतवणुकीमुळे आपण मुलींकडे फारसे लक्ष देऊ शकलो नाही, परंतु आपली पत्नी सुनीता ह्यांनी मात्र कौशल्याने घराची बाजू सांभाळली असे त्यांनी आवर्जून सांगितले.